मी मराठी माय मराठी

Mi Marathi Mai Marathi 

भारतीय सण

Indian Festivals

दूरभाष:  +१ (७८५) ७६० १३६१

Tel:  +1(785) 760 1361

गुढीपाडवा

हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षातील पहिला सण गुढीपाडवा आहे. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक असून कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करण्यास शुभ मानतात. आपला भारतीयांचा नवीन वर्षाचा प्रारंभ याच दिवशी म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदेस होतो. म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असे म्हणतात. याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणून काही ठिकाणी ह्या दिवसाला ब्रह्मपूजा तसेच जो वार असेल त्या अधिपतींची पूजा करतात. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालीवाहन राजाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

गणेश चतुर्थी

आपल्या भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची जन्म कथा अशी आहे. एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली. काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले. पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेंव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नांव ठेवले. हा दिवस चतुर्थी चा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे. या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या महाराष्ट्नत फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. ह्या गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली.

दीपावली

दिवाळी हा हिंदुंचा सर्वात मोठा सण आहे. हा सण घरोघरी दिव्यांच्या ओळी लावून साजरा करतात म्हणून त्यास दिपावली किंवा दिवाळी असे म्हणतात. हा सण पाच दिवस अतिशय आनंदाने साजरा केला जातो.

धन त्रयोदशी - आश्विन शुध्द त्रयोदशीस धनत्रयोदशी हे नाव दिले आहे. यमराजाने आपल्या दूतास या दिवशी जो दिपोत्सव साजरा करेल त्याला अपमृत्यु येणार नाही. असे सांगितल्याची कथा आहे. या दिवशी मंगलस्नान करून दक्षिणेकडेही तोंड करून दिवे लावतात.

नरकचतुर्दशी - या दिवशी कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराचा वध करून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला त्यावेळी मंगलस्नान घालून त्याला ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात.

लक्ष्मीपूजन - हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. या दिवशी सायंकाळी अष्टदल, कमळावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतिक आहे. संयमपूर्वक धनसंपादन केले तर मनुष्याचे कल्याण होईल लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्या व प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते या रात्री दिव्यांची रोषणाई करतात.

बलिप्रतिपदा - पौराणिक काळात बळी नावाच्या दानशूर राजाने पूर्ण जग जिंकले होते त्याचा पराभव करण्याकरता भगवान `विष्णुंनी' वामन रूप धारण करून त्याला पाताळलोकात लोटले मात्र त्याच्या दानशूरपणावर खूष होऊन या पुढे कार्तिक प्रतिपदा बली प्रतिपदा म्हणून ओळखल्या जाईल असा वर दिला. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी अर्धा मानला जातो. विक्रम संवत शकाच्या वर्षारंभ याच दिवशी येतो म्हणून शक मानणारा (गुजराती) व्यापारी वर्ग त्या दिवशी धंद्याच्या हिशोबाचा किर्दखतावणीच्या नवीन वह्यांचे पूजन करून प्रारंभ करतात. या दिवशी पत्नीने पतीला व मुलीने वडीलांना ओवाळण्याची पध्दत आहे.

भाऊबीज - कार्तिक शुध्द व्दितीयेला भाऊबीज म्हणतात. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे बरेच दिवसांनी गेला तेंव्हा तिने त्याला ओवाळले व आनंद व्यक्त केला तेंव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली आहे. या दिवसाला यम व्दितीयाही म्हणतात. स्त्रिया चंद्राला भाऊ मानून ओवाळतात.

मकर संक्रांत

पौष महिन्यात सुर्य मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरायण सुरू होऊन उत्तर गोलार्धात राहणाऱ्या आपण भारतीयांना जास्त प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होतो. हा दिवस मोठा होतो व रात्र लहान होत असते. म्हणून सर्वांना मकर संक्रमण दिवस हा उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटतो. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान व दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात.

मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली.

या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात व देवाला तीळ व तांदूळ अर्पण करतात व संक्रांत निमित्य सौभाग्य वाण लुटतात. हा सण परस्परांमध्ये स्नेह व प्रेम असावे असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीने महत्वाचा आहे. या दिवशी तीळगुळ देतांना ``तीळगुळ घ्या, गोड गोड बोला'' असे म्हणण्याची पध्दत आहे.

या दिवशी लहान थोर सर्व मंडळी विविध रंगाच्या पतंगी उडविण्याचा आनंद लुटतात. संध्याकाळच्या वेळी आकाश विविध रंगांच्या पतंगीने सुशोभित झालेले असते. हा सण परस्परांमध्ये प्रेम व सद्भाव वृध्दिंगत करीत असतो.